Wednesday, December 23, 2015

वाचन संस्कार रुजविणा-यांबद्दल आत्मीयता : चंदावरकर (दै. सकाळ)

(Click on image to read)

वाचन संस्कार रुजविणा-यांबद्दल आत्मीयता : चंदावरकर
- सकाळ, पुणे
बुधवार, 23 डिसेंबर 2015


"मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी पाश्‍चात्त्य देशात नव-नवीन प्रयोग सुरू आहेत. आपल्याकडेही काही प्रयत्न होत आहेत, परंतु तळागाळातील मुलांपर्यंत ते पोचत नाहीत. अशा मुलांपर्यंत वाचन संस्कार पोचविण्यासाठी धडपडणाऱ्या स्वयंसेवी संस्थांविषयी मला आपुलकी आणि आत्मीयता वाटते," असे मत शिक्षणतज्ज्ञ मीना चंदावरकर यांनी येथे व्यक्त केले.

विविध संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या "सामाजिक संस्थांचे वाचन संस्कार नेटवर्क‘च्या उपक्रमांतर्गत आयोजिलेल्या "चला, वाचन रंजक बनवूया‘ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. "डोअर स्टेप‘च्या संस्थापिका रजनी परांजपे, शिक्षण मंडळाच्या उपशिक्षणप्रमुख शुभांगी चव्हाण, "स्वाधार‘च्या अंजली बापट, वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या सुषमा साठे, स्नेहदीप जनकल्याण फाउंडेशनचे डॉ. प्रकाश भंडारी, क्षितिज संस्थेच्या उमा माने व संजय राऊत या वेळी उपस्थित होते.

मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच गप्पा, गोष्टी, गाणी, खेळ, चित्रवाचन, भित्तिपत्रके आणि पुस्तक वाचनातून मुलांमध्ये वाचन संस्कार कसे रुजवावे, याची प्रात्यक्षिक दाखविली.

चंदावरकर म्हणाल्या, "वाचन मुलांना समृद्ध बनवते आणि विचार करण्यास प्रवृत्त करते. मराठी भाषेत आज खुपसे प्रयोग राबविले जात असून, त्यातून मुलांमध्ये वाचनाची आवड रुजत असल्याचे समाधान आहे. पूर्वी मुलांना चांगली शाळा व चांगले शिक्षक मिळायचे. पण काळ बदलल्याने चांगले शिक्षक हरपले. भाषेची व व्याकरणाची जाण आपल्यात उपजतच असते. फक्त त्याला जाणून घेण्याची गरज आहे. दूरचित्रवाणी पाहून ज्ञान मिळत नाही. पुस्तक वाचल्याने मनाला शांती व शारीरिक सुख मिळते."

चव्हाण म्हणाल्या, "लहानपणीच मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हायला हवी. अध्यापन आनंददायी करायचे असेल, तर मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याची आवश्‍यकता आहे."