Thursday, May 17, 2012

शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल बांधकाम व्यावसायिकांचा गौरव

            दिवसागणिक विस्तारत चाललेल्या पुणे शहरातील एक महत्त्वाचे उद्योगक्षेत्र म्हणजे बांधकाम व्यवसाय. आधुनिक तंत्रज्ञान, स्थापत्य कौशल्य, आणि व्यावसायिक यशासोबतच या क्षेत्राचा एक अविभाज्य भाग म्हणजे मनुष्यबळ. केवळ मोठमोठे प्रकल्प व नफ्याच्या गणितांपलिकडे जात, बांधकाम क्षेत्रातील असंघटीत व विस्थापित कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देणार्‍या बांधकाम व्यावसायिकांचा 'डोअर स्टेप स्कूल' संस्थेतर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. 'डोअर स्टेप स्कूल' ही संस्था कामगारांच्या मुलांसाठी पुण्यातील सुमारे १०० बांधकाम साईटवर वर्ग चालवते. या कार्यामध्ये संस्थेला सहकार्य करणार्‍या बांधकाम व्यावसायिकांचा संस्थेतर्फे 'एज्युकेअर अ‍ॅवॉर्ड' देऊन गौरव करण्यात आला. शनिवार, दि.१२ मे २०१२ रोजी नवी पेठेतील 'निवारा' येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास क्रेडाई (बिल्डर्स असोसिएशन) पुणे, कामगार-कल्याण समितीचे अध्यक्ष अनुज भंडारी उपस्थित होते. 'डोअर स्टेप स्कूल'च्या संचालिका जयश्री जोगळेकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. बांधकाम मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी क्रेडाई व बांधकाम व्यावसायिकांकडून मिळणार्‍या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. भंडारी यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घेतली जात असल्याने, कामगार अधिक कार्यक्षमतेने व आनंदाने काम करु शकतात, ज्यामुळे कामाची गुणवत्ता सुधारुन बांधकाम व्यावसायिक व ग्राहक, दोघांनाही फायदा होतो, असे ते म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील बिल्डर्सच्या योगदानाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन, भविष्यात हा सहभाग वाढत जाईल, अशी अपेक्षा श्री. भंडारी यांनी यावेळी व्यक्त केली.



            'डोअर स्टेप स्कूल'च्या संस्थापिका रजनी परांजपे यांनी 'एव्हरी चाइल्ड काउंट्स' अभियानाबद्दल माहिती दिली व पुण्यातील सर्व सहा वर्षाच्या मुलांना शाळा-प्रवेशात मदत करण्यासाठी, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रोजेक्ट डायरेक्टर रविंद्र महामुनी यांनी सूत्रसंचालन व आभार-प्रदर्शन केले. पुण्यातील नामवंत बिल्डर्स व त्यांचे प्रतिनिधी, तसेच संस्थेचे देणगीदार, स्वयंसेवक, कार्यकर्ते, व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेतर्फे राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांशी संबंधित प्रदर्शनास उपस्थितांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

No comments:

Post a Comment