News & Updates from Door Step School Foundation - an NGO working for education of children from marginalized and migrant communities.
Monday, May 20, 2013
‘डोअर स्टेप स्कूल’चा २०वा वर्धापनदिन
पुण्यातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणार्या ‘डोअर स्टेप स्कूल’ या सेवाभावी संस्थेचा २०वा वर्धापनदिन सोहळा ११ मे रोजी पार पडला. ‘निवारा’ वृद्धाश्रमाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेच्या शिक्षिका, स्वयंसेवक, तसेच देणगीदार, व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. ‘डोअर स्टेप स्कूल’च्या पुण्यातील २० वर्षांच्या वाटचालीबद्दल बोलताना संस्थापिका रजनी परांजपे म्हणाल्या, “समाजातील असमानता, बेरोजगारी, गरीबी, अशा अनेक समस्यांवर शिक्षण हा एकमेव उपाय असल्याचे दिसून आल्याने २५ वर्षांपूर्वी मुंबईत व २० वर्षांपूर्वी पुण्यात ‘डोअर स्टेप स्कूल’चे काम सुरू केले. भविष्यातील कोणत्याही क्षेत्रासाठी मुलभूत शिक्षणाला पर्याय नसल्याने, वंचित गटातील मुलांना किमान साक्षरतेपर्यंत पोचविण्याचे उद्दिष्ट संस्थेने ठरविले. विस्थापित मजूरांच्या मुलांची स्थलांतराची समस्या लक्षात घेऊन, शिक्षक व शिक्षणसामग्रीसहित शाळाच त्यांच्या दारी नेण्याचा प्रयोग संस्थेने यशस्विरीत्या केला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या शाळांमधून ‘वाचन वर्ग’, रस्त्यांवरील मुलांसाठी ‘फिरती शाळा’, वस्त्यांमधील मुलांसाठी ‘अभ्यासिका’, बांधकाम साईटवर राहणार्या मुलांसाठी शालेय वाहतुकीची सोय, तसेच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागरिक अभियान, अशा विविध उपक्रमांद्वारे ‘डोअर स्टेप स्कूल’ शिक्षणप्रसाराचे कार्य करीत आहे.” संस्थेच्या २० वर्षांच्या वाटचालीत हजारो हातांची साथ लाभल्याने काम करण्याचे बळ मिळत गेले, पण अजूनही संस्थेने हाती घेतलेले काम पूर्ण झाले असे वाटत नाही; उलट, पुण्यातील सर्व मुलांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी आणखी संस्था व व्यक्तिंनी पुढे यावे व हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास मदत करावी, असे आवाहनही सौ. परांजपे यांनी केले. संस्थेच्या विविध उपक्रमांच्या गतवर्षातील कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. या उपक्रमांमध्ये काम करणार्या शिक्षिकांनी अनोख्या पद्धतीने वार्षिक अहवालाचे सादरीकरण केले. संस्थेच्या शिक्षिकांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन यावेळी लावण्यात आले होते.
Labels:
Annual Presentation
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment