पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या शाळेत घडला चमत्कार!
पहिलीतली मुलं पहिलीतच लागली घडाघडा वाचायला!!
कसा घडला हा चमत्कार?
मनपा शाळांमधील मुलांच्या वाचनक्षमतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बहुतेक सर्व पाहण्यांमधून हाती आलेला निष्कर्ष म्हणजे - इयत्तेनुसार मुलांची वाचनक्षमता विकसित झालेली नाही, चौथीच्या मुलांनाही मुळाक्षरे वाचण्यात अडचण, वगैरे वगैरे. पण हे चित्र बदलायचं ठरवलं पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्याच शाळांमधील आणि ‘डोअर स्टेप स्कूल’ या सेवाभावी संस्थेमधील शिक्षिकांनी. पहिलीतल्या मुलांचा क्रमबद्ध रीतीने मुळाक्षर-जोडाक्षर-बाराखडीशी परिचय करुन देण्यासाठी व मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी या शिक्षिकांनी गेल्या शैक्षणिक वर्षात अभिनव पद्धतीने परिश्रम घेतले आहेत. आणि या परिश्रमातूनच त्यांनी घडवला चमत्कार - पहिलीतली मुलं पहिलीतच लागली घडाघडा वाचायला!!
पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या १२० शाळांमधील पहिल्या इयत्तेतील ६,००० विद्यार्थ्यांच्या वाचनक्षमतेत मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत गेल्या वर्षी ४३ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. मागच्या शैक्षणिक वर्षाखेरीस संपूर्ण बाराखडी व जोडाक्षरे वाचता येणार्या मुलांचे प्रमाण १० टक्क्यांवरुन ५३ टक्क्यांवर पोचलेले आढळून आले आहे. पहिल्या इयत्तेतून दुसर्या इयत्तेत जाणार्या मुलांपैकी सर्व मुळाक्षरेही वाचता न येणार्या मुलांचे प्रमाण ३९ टक्क्यांवरुन १२ टक्क्यांवर आले आहे. मुलांना मुळाक्षरे व काना-मात्रा शिकवण्यासाठी अक्षर-खेळ घेणे, आकर्षक तक्त्यांच्या व चित्रांच्या माध्यमातून अक्षरे शिकविणे, मुलांना आवडतील अशा गोष्टी व गाण्यांच्या मदतीने वाचनाची गोडी निर्माण करणे, अशा प्रकारचे प्रयत्न या पुणे व पिंपरी-चिंचवड मनपा शाळा व ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिकांनी केले. त्याबरोबरच, पालकांच्या सहभागाचे महत्त्व लक्षात घेऊन पालकसभा घेणे, पालकांना मुलांच्या प्रगतीचा अहवाल देणे, वाचन-सरावासाठी अक्षरतक्ते बनवून घरी लावण्यासाठी देणे, या गोष्टीही करण्यात आल्या.
केवळ वर्गात अनुपस्थित राहिल्यामुळे वाचनक्षमतेत मागे पडलेल्या मुलांची संख्यादेखील लक्षणीय असल्याने, अनुपस्थितीची कारणे शोधून मुलांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक वाटले. मुलांच्या अनुपस्थितीमागे दोन प्रमुख कारणे दिसून आली, ती म्हणजे - शालेय वाहतुकीचा अभाव व मुलांसहीत संपूर्ण कुटुंबांचे सतत स्थलांतर. पहिल्या इयत्तेतील मुलांचे स्वतःहून शाळा सोडण्याचे प्रमाण कमी असून, केवळ शाळा लांब आहे, चालत जाऊ शकत नाही, एकट्याने शाळेपर्यंत जाऊ शकत नाही, शालेय वाहतुकीचा खर्च पालक करु शकत नाहीत, अशी कारणे समोर आली आहेत. अशा मुलांना पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाच्या शाळांमधून शालेय वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देता आल्यास त्यांची एकूण उपस्थिती वाढून, पहिल्या इयत्तेतच ती साक्षर बनू शकतील, हे नक्की!
No comments:
Post a Comment