Friday, January 8, 2016

सामाजिक संस्थांमुळे मुलांना वाचनाची 'गोडी' - दै. सकाळ

सामाजिक संस्थांमुळे मुलांना वाचनाची 'गोडी'
- सुवर्णा चव्हाण
सोमवार, 4 जानेवारी 2016 । दै. सकाळ, पुणे

गप्पा, गोष्टी, गाणी अन्‌ शब्दखेळ यातून लहान मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्याचे काम "सामाजिक संस्थांचे वाचन संस्कार नेटवर्क‘ या उपक्रमातून होत आहे. जोडाक्षराचे रेखाटन, बालकथांचे विश्‍व आणि बाराखडीचा उच्चार असे सारे काही या उपक्रमामुळे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना उमगू लागले आहे.

पाच सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या या उपक्रमाने सुमारे 70 हजार मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण केली आहे. पुणे जिल्ह्यातील 337 शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची या आगळ्या-वेगळ्या उपक्रमातून वाचनाशी गट्टी जमली आहे.

"डोअरस्टेप स्कूल‘ संस्थेने हा उपक्रम 1999 मध्ये सुरू केला. सुरवातीला एका संस्थेने सुरू केलेल्या या उपक्रमाशी स्वाधार, वनस्थळी, क्षितिज आणि स्नेहदीप अशा चार संस्था जोडल्या गेल्या. आता या उपक्रमाला पंधरा वर्ष उलटली असून, हजारो विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यात या सामाजिक संस्थांना यश आले आहे. तसेच या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना घरीच पुस्तके वाचनासाठी मिळत असल्याने त्यांचे वाचनाशी एक अतूट नाते निर्माण झाले आहे. हा सकारात्मक बदल घडलाय तो या संस्थांच्या शिक्षिकांमुळे. आठवड्यातील दोन तास पुणे जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन त्या विद्यार्थ्यांचे अवांतर वाचनाचे तास घेतात.

या सामाजिक संस्थांच्या वाचन संस्कार नेटवर्कद्वारे घेण्यात येणाऱ्या तासिकांचा मुलांना लाभ होत आहे. या प्रकल्पाद्वारे काना, वेलांटी, उकार, मात्रा, जोडाक्षरे शिकवणारी पुस्तके, गोष्टी आणि गाण्यांची पुस्तके कशी वाचावीत आणि त्यातील गमती-जमती समजावून देण्याचा प्रयत्न संस्थांकडून होत आहे. वाचन कसे करावे, आणि कोणती पुस्तके वाचावीत, याची संपूर्ण माहिती दिली जात आहे.

"अस्मय‘ संस्थेचे या उपक्रमाला आर्थिक पाठबळ मिळत आहे. या सर्व मुलांना संस्थेने तयार केलेली जोडाक्षरे, गोष्टी व गाण्यांची पुस्तके प्रत्येक आठवड्याला वाचनासाठी देण्यात येतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वअध्ययनाची शिस्त रुजली आहे. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी आम्ही पाच संस्थांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार वाचता येईल, अशी पुस्तके दिली जातात.
- रजनी परांजपे, संस्थापिका, डोअरस्टेप संस्था

(Click on image to read)

No comments:

Post a Comment