Thursday, July 7, 2016

DSS News in Lokmat Newspaper 05-Jul-16


डोअर स्टेप स्कूलचा उपक्रम : कष्टकर्‍यांच्या मुलांसाठी शिक्षकांनीच घेतला पुढाकार
दै. लोकमत ।  प्राची मानकर, पुणे, मंगळवार, दि. ५ जुलै २१६

कष्टकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणातील सर्वांत मोठा अडथळा म्हणजे त्यांच्यावर असणारी लहान भावंडांची जबाबदारी. आई-वडील दोघेही कामावर गेल्यावर लहान भावंडांना सांभाळताना या मुलांना शिक्षणावर पाणी सोडावे लागते. यासाठी डोअर स्टेप स्कूल या संस्थेने अनोखा उपाय योजला आहे. विद्यार्थ्यांच्या भावंडांना शिक्षिका सांभाळतात आणि ही मुले शिक्षण घेतात.
बिगारी काम, वीटभट्टीवरील काम करणार्‍या कामगारांच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी डोअर स्टेप संस्थेच्या माध्यमातून सर्व्हे केला गेला. बांधकामांच्या साईटवर जाऊन मुलांची संख्या किती आहे हे तपासून पाहिले गेले. डोअर स्टेप संस्थेच्या शिक्षिका येथेच मुलांना शिकवितात. या वेळी काही शिक्षिका त्या विद्यार्थ्यांच्या एक ते दीड वर्षाच्या भावंडांना सांभाळतात. यासाठी संस्थेच्या वतीने बिगारी काम करणार्‍या कामगारांचे समुपदेशन केले जाते आणि तुमच्या मुलांची काळजी आम्ही घेऊ, असे समुपदेशन संस्थेच्या शिक्षिकेच्या मार्फत केले जाते. सिंहगड रस्ता, कोंढवा, कात्रज, खराडी, चिखली, तळेगाव, मोशी, हिंजवडी, पाषाण, बाणेर, भूगाव अशा ८० बांधकाम साईटवर डोअर स्टेपच्या ३०० शिक्षिका त्या-त्या भागात जाऊन बिगारी काम करणार्‍या कामगारांच्या मुलांना शिक्षण देत आहेत. प्रत्येक साईटवर ४ शिक्षिका नेमून दिलेल्या आहेत. दोन शिक्षिका या मुलांना शिकवितात आणि दोन शिक्षिका त्या मुलांच्या भावंडांचा सांभाळ करतात. या मुलांना बोलावे कसे, स्वत:ची निगा कशी राखावी, याचे शिक्षण दिले जाते. काही भागांत या मुलांच्या घराजवळ शाळा नसते. मग डोअर स्टेप या संस्थेची स्कूलबस अशा मुलांना शाळेत सोडते.

चाकांवरची शाळा
ज्या भागात ही मुले असतील त्या भागात डोअर स्टेप स्कूलची बस जाते आणि त्या मुलांना त्या बसमध्ये बसविले जाते. या बसमध्ये १ ते २ शिक्षिका असतात. पुढे प्रत्येक भागात जाऊन अशी मुले गोळा करतात. पण काही ठिकाणामध्ये अंतर असल्यामुळे या मुलांना गाडीमध्येच शिकविले जाते. या गाडीमध्ये फळा, मुलांना बसण्यासाठी सतरंज्या टाकलेल्या आहेत. आणि सगळी मुले जमल्यावर ही गाडी एका ठिकाणी थांबविली जाते आणि तिथेच त्यांची १ ते २ तास शाळा घेतली जाते.

चाकावरची शाळा या उपक्रमामध्ये दिवसातून तीन वर्ग भरतात. यासाठी डोअर स्टेप स्कूलच्या तीन स्कूल व्हॅन आहेत. ही चाकावरची शाळा हडपसर, बाणेर आणि वाकड या भागामध्ये भरली जाते. ६ ते १४ वयोगटातील मुले या वर्गात असतात. एका वर्गात २५ मुले आणि दोन शिक्षिका आहेत. या मुलांना एका जागेवर दोन तास बसण्याची सवय नसते. अशा मुलांना बसण्याची सवय लावायची, स्वच्छता निगा कशी राखायची, बोलायचे कसे या सगळ्या बेसिक गोष्टी मुलांना या वर्गात शिकविल्या जातात. आणि नंतर पालकांशी संवाद साधून, मुलांच्या घराजवळ शाळा आहे की नाही हे तपासून प्रत्येक मुलाला महानगरपालिकेच्या शाळेत घातले जाते आणि ते मूल शाळेत जाते की नाही हेसुद्धा तपासले जाते.

कन्स्ट्रक्शन साईटवर वर्ग
"सिंहगड रस्ता, कोंढवा, कात्रज, खराडी, चिखली, तळेगाव, मोशी, हिंजवडी, पाषाण येथील प्रवाहाबाहेरच्या मुलांना प्रवाहात आणण्याचे काम आम्ही करतो. प्रत्येक मूल शिकले पाहिजे आणि ते शाळेत गेले पाहिजे, हा आमचा मानस आहे. मुलगा आणि शाळा यांच्यामधील पूल होण्याचे काम आम्ही करीत आहोत. ३ ते ६ आणि ६ ते १४ वयोगटातील मुलांना आम्ही शिक्षण देण्याचे काम करतो. आम्हाला आमचे काम आणखी वाढवायचे आहे; पण त्याच्यासाठी मनुष्यबळ कमी पडत आहे."
- रजनी परांजपे, विश्‍वस्त, डोअर स्टेप स्कूल

No comments:

Post a Comment