Tuesday, April 11, 2017

SSRBM Kids Meet New Friends at DSS Bavdhan Center

पुण्यातल्या बावधन भागामधे बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी ‘डोअर स्टेप स्कूल’तर्फे वर्ग चालवला जातो. साधारण तीन वर्षांपासून ते चौदा वर्षांपर्यंतची मुले दररोज या वर्गाला येतात. ‘डोअर स्टेप स्कूल’च्या शिक्षिका या मुलांना मराठी अक्षर ओळख, अंक ओळख, वाचन, लेखन, तसेच विविध खेळ व प्रकल्प शिकवतात. बावधन भागातच ‘श्री श्री रविशंकर बालमंदीर’ ही लहान मुलांची शाळा आहे. या शाळेतील मुलांनी व शिक्षिकांनी नुकतीच ‘डोअर स्टेप स्कूल’च्या बांधकाम साईटवरील वर्गाला भेट दिली. बालमंदीराच्या मुलांनी पपेटच्या माध्यमातून एक गोष्ट सादर केली. त्यांच्यासोबत आलेल्या शिक्षिका ज्योत्स्नाताई यांनी दोन्ही गटातल्या मुलांचे एकत्रित खेळ घेतले. मुलांनी एकत्र गाणी म्हटली आणि डान्सही केला. दोन्हीकडील मुलांच्या चेहर्‍यांवर नवीन मित्र मिळाल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता.

श्री श्री रविशंकर बालमंदीरच्या संचालिका सायली कुलकर्णी यांनी या भेटीबाबतचा अनुभव छान शब्दांत लिहून पाठवला आहे.

आज डोअर स्टेप स्कूलच्या बावधन प्रकल्पाला भेट देण्याचा योग आला. आणि त्या योगाने एका मस्त अश्या छोट्या दोस्ताची ओळख झाली. 'हरी' - हरिहर यादव, वय वर्ष अवघे १० ते १२ असावे. बांधकाम करणाऱ्या कामगारांचा मुलगा. 'हरी' - पहात क्षणी नजर खिळवून ठेवणारे चुणचुणीत व्यक्तिमत्त्व. खरेतर या वयाची बरीचशी मुले अशीच असतात. पण हा हरी मनाच्या कोपऱ्यात घर करून गेला ते वेगळ्याच कारणाने. ते म्हणजे - हरीची सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये असणारी इनव्हॉलमेंट. आसपासच्या मुलांची चुळबुळ, आजूबाजूने येणारे मोठे आवाज, काढले जात असणारे फोटोज, या आणि यांसारख्या कोणत्याही व्यत्ययांचा त्याच्या एकाग्रतेवर काडीचाही फरक पडत नव्हता. गाणे म्हणणे, नाच करणे यांसारख्या कृती तो अगदी १००% करत होता. भूत-भविष्याचा कसलाही परिणाम न जुमानणारा, साधनामग्न योगीच जणू हरीच्या रूपात माझ्यासमोर होता. मनात विचार आला की, परमेश्वराचे कार्यमग्न हरिरूप असेच असेल का? आणि मग दिवसभर मनात या हरी नामाचा गजर रंगला. आपण स्वतः खरंच प्रत्येक गोष्ट एवढी मनापासून, १००% करतो का? भूतकाळातील अनावश्यक ओझी नि भविष्याची अकारण चिंता यामध्ये वर्तमानात जगणे विसरूनच जातो. कोण आपल्याबद्दल काय विचार करेल नि काय म्हणेल, यात नैसर्गिक हालचालींवर बंधने आणतो. आजूबाजूच्या छोट्या छोट्या अडचणी घेऊन स्वतःच स्वतःपुढे व्यत्ययांचे मोठे डोंगर उभे करतो. आज या हरीच्या रूपाने पुन्हा एकवार स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या जवळ जाण्याची संधी मिळाली. आणि या मुलांना काहीतरी द्यायला गेलेल्या मलाच खूप काही असे मिळून गेले. आज मला या 'हरी'च्या रूपाने जणू माझ्यातील 'हरी' भेटला.

- सायली कुलकर्णी


No comments:

Post a Comment